Thursday, August 11, 2011

नागपूर - चार महिन्यांपूर्वी इमामवाड्यात दुहेरी हत्याकांड घडवून आणणाऱ्यांपैकी एका कुख्यात गुंडाचा आज त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी दिवसाढवळ्या निर्घृण खून केला. पिंकू ऊर्फ गणेश मारुती घोंगडे (वय 26) असे मृताचे नाव आहे. घातक शस्त्रांचे घाव घालून आरोपींनी घोंगडेच्या शरीराची चाळण केल्यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही, म्हणून की काय, मारेकऱ्यांनी घोंगडेच्या डोक्‍यावर भला मोठा दगड घालून त्याचा खातमा केला. आज सकाळी पावणेअकराला अजनीतील जादूमहल परिसरात घडलेल्या या निर्घृण खुनाच्या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.

अवैध प्रवासी वाहतुकीसोबतच अवैध धंद्यांतसुद्धा गुंतलेल्या अजनी-इमामवाड्यातील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. यातूनच 5 एप्रिलला इमामवाड्यातील जाटतरोडी भागात कुख्यात पिंकू घोंगडे, ताराचंद खिल्लारे आणि त्यांच्या साथीदारांनी बबलू ऊर्फ राजेंद्र कालिचरण सहारे तसेच राजू बापूराव कांबळे या दोघांची अत्यंत निर्दयपणे हत्या केली होती. या दुहेरी हत्याकांडाचा सूड उगवण्यासाठी बबलू आणि राजूच्या साथीदारांनी तेव्हापासूनच घोंगडे-खिल्लारे टोळीतील आरोपींचा खातमा करण्याचा कट रचला होता. ते संधीची वाट बघत होते.

पिंकू, ताराचंद तसेच त्यांच्या साथीदारांचा दुहेरी हत्याकांडात गेल्या महिन्यातच जामीन मंजूर झाला आणि 20 दिवसांपूर्वी ते कारागृहातून बाहेर आले. घोंगडेच्या दोन बहिणी पोलिस खात्यात आहेत. एक अजनी ठाण्यात; तर दुसरी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. घोंगडे आपल्या बहिणीच्या रघूजीनगरातील पोलिस कॉर्टरमध्येच राहत होता. तो जामिनावर बाहेर आल्यापासून आरोपी सुमित चित्तलवार, नयन चित्तलवार आणि त्यांचे साथीदार दुहेरी हत्याकांडाचा सूड उगवण्यासाठी आरोपींच्या मागावर होते. आज न्यायालयात पेशी असल्यामुळे आरोपी बाहेर पडणार याची खात्री असल्यामुळे सुमित, नयन, शिकू, खट्या-वाकडतोंड्या, मायकल, टिक्‍क्‍या, गब्बर आदींनी चॉपर, तलवारी, गुप्ती तसेच अन्य अवजारे जमा केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंकू पोलिस कॉर्टरमधून मोटरसायकलने बाहेर पडला. तो राजकमल चौकाजवळ दिसताच सात-आठ मोटरसायकलींवरील आरोपींनी घोंगडेचा पाठलाग सुरू केला. त्याची जाणीव होताच घोंगडेने त्यांना चुकविण्यासाठी राजकमल चौकातून मिळेल त्या गल्लीत आपली मोटरसायकल घातली. तो गुंगारा देत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी वेगवेगळ्या गल्ल्यांमधून त्याच्यावर झडप घालण्यास व्यूहरचना केली. अखेर विश्‍वकर्मानगरात, जादूमहलजवळ (श्रद्धा अपार्टमेंटसमोर) आरोपींनी त्याला गराडा घातला. सुमित चित्तलवार, नयन चित्तलवार, खट्या-वाकडतोंड्या, मायकल, टिक्‍क्‍या, गब्बर, अमोल, शिब्बू ऊर्फ सिब्बू सब्बेसियन, गिरीश वासनिक, सचिन वासनिक, अक्षय वाघमारे, विजय कांबळे, संजय वाघाडे, विकास गेडाम, दिनेश सेलोकर, प्रवीण मुरारकर, लोकेश भगत आणि अन्य तीन ते चार जणांनी घोंगडेला त्याच्या दुचाकीवरून खाली पाडले आणि त्याच्यावर घातक शस्त्रांचे तब्बल 34 घाव घातले. त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण करतानाच मारेकऱ्यांनी घोंगडेच्या दोन्ही हातांची बोटे तोडली. एवढे करूनही मारेकऱ्यांचे समाधान झाले नाही, म्हणून की काय, एकाने बाजूला पडून असलेला भला मोठा दगड उचलून आणला आणि घोंगडेच्या डोक्‍यात घातला. भररस्त्यात घडलेल्या या थरारक खुनामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. दरम्यान, माहिती कळताच अजनीचा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृताचा भाऊ राजेश घोंगडे आणि अन्य साथीदारही घटनास्थळी आले. त्यांनी सुरू केलेल्या आक्रोशामुळे तणाव वाढू लागला. पोलिसांनी लगेच मृतदेह घटनास्थळावरून मेडिकलमध्ये रवाना केला. तेथेही घोंगडेचे तीनचारशे साथीदार तेथे पोचले. तेथे तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा ताफा मेडिकलमध्ये पोचला.

मारेकऱ्यांची व्हिक्‍टरी
अशा पद्धतीने आपल्या मित्रांच्या (सहारे-कांबळे) खुनाचा सूड उगवल्यानंतर आणि घोंगडे मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर मारेकऱ्यांपैकी एकाने भांगड्याचा पवित्रा घेतला; तर काहींनी हात उंचावून "व्हिक्‍टरी' दाखविली. वृत्त लिहीस्तोवर कोणत्याही आरोपीला अटक झालेली नव्हती. घोंगडेचे साथीदार आणि मारेकरी एकाच भागात जाटतरोडीत राहत असल्यामुळे या भागात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. कोणत्याही क्षणी टोळीयुद्ध भडकले जाऊ शकते, अशी शक्‍यता असल्यामुळे या भागात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला आहे.

क्राइम हिस्टरी
या खुनामागे मोठी "क्राइम हिस्टरी' आहे. मृत घोंगडे याने 2008 मध्ये धंतोलीत एकाचा खून केला होता; तर चार महिन्यांपूर्वी बबलू सहारे आणि राजू कांबळे या दोघांवर अनुक्रमे 27 आणि 17 घाव घालून आपल्या ताराचंद खिल्लारे व अन्य 8 साथीदारांच्या मदतीने निर्घृण हत्या केली होती. याव्यतिरिक्त त्याच्यावर धंतोली, इमामवाडा पोलिस ठाण्यांत अनेक छोटे-मोठे गुन्हे दाखल झालेले होते. शहरातील एका मोठ्या गुन्हेगाराच्या छत्रछायेत त्याने ताराचंद खिल्लारेसोबत आपली नवी टोळी निर्माण केली होती. ताराचंद सुभाष भोवतेच्या मदतीने बबलू सहारेचा मित्र निखिल कैथवासची हत्या केली होती. तर, त्याचा बदला घेण्यासाठी बबलू सहारे आणि राजू कांबळेने सुभाषचा गेम केला होता. परिणामी पिंकू घोंगडे आणि ताराचंदने बबलू आणि राजूचा मुडदा पाडला. आता बबलू आणि राजूच्या साथीदारांनी पिंकू घोंगडेचा खातमा केला. तिकडे घोंगडेच्या साथीदारांनीही लगेच एका गुत्त्यावर एकत्र येऊन या खुनाचा सूड उगवण्याची घोषणा केल्याची माहिती आहे.

No comments: